ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
बापू बिरू वाटेगांवकर (१९२२: मु.पो.बोरगांव ता.वाळवा जि.सांगली मृत्यू:१६ जानेवारी, २०१८ ,आधार हास्पिटल इस्लामपूर). हे अन्यायाविरोधात गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले होते.[ संदर्भ हवा ] त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. बोरगांवातील रंगा शिंदे हा गोर-गरिबांना त्रास देत असे. गावातील स्त्रियांची छेड काढत असे. बापू बिरू वाटेगावकरांनी त्याची हत्या केली. रंगाच्या भावानेही (आनंदा शिंदे) असाच उच्छाद मांडला, तेंव्हा बापू बिरु वाटेगावकरांनी त्याचीही हत्या केली.बापूंना अटक करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही ते पकडले न गेल्याने पोलिसांनी बापू बिरु वाटेगावकरांच्या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केली.
२५ वर्षे सह्याद्रीच्या डोंगर रांगामंध्ये राहून बापू बिरु वाटेगावकरांनी गरीबांना मदत केली. अन्यायाविरुद्ध लढताना बापू बिरु वाटेगावकर पोलिसांपासून पळतच राहिले आणि कृष्णा-खोरे दहशतीच्या विळख्यातून मुक्त केल्यावर एके दिवशी आपल्या लढयाला पूर्णविराम देऊन त्यांनी पोलिसांसमोर बिनशर्त शरणागती पत्करली. भारतीय घटनेनुसार बापू बिरू वाटेगावकर वर कित्येक खुनांच्या मालिकेचे गुन्हे दाखल झाले आणि त्यांना 'जन्मठेपेची' शिक्षा सुनावली. शिक्षा भोगून ते गावी परतले आणि त्यांनी उर्वरित आयुष्य भजन, कीर्तन आणि प्रवचनात व्यतीत केले. तंबाखू, सिगारेट व दारू अशा व्यसनांच्या आहारी जाऊन भरकटणारी तरुण पिढी वाचविण्यासाठी ते गावोगावी प्रवचने करत. बापू बिरु वाटेगावकरांनी हुंडा पद्धतीला विरोध करत कित्येक लेकी-सुनांचे नांदणे बसवले, कित्येकांची कर्जे मुक्त केली, कित्येकांच्या जमिनी सोडवून दिल्या यासाठी वेळप्रसंगी त्यांनी बंदूकही चालविली.
अगदी त्यांच्या स्वतःच्या मुलाने (तानाजी वाटेगावकर) पर-स्त्रीचे अपहरण केल्यावर त्यालासुद्धा त्यांनी गोळी घालून ठार केले.
असे म्हणतात की बापू बिरू वाटेगावकर फरारी असताना कुख्यात चंदनतस्कर "वीरप्पन" ने त्यांना बोलावून घेतले आणि त्याच्या टोळीत सामील होण्यास सांगितले, यावर बापू बिरू वाटेगावकर गरजले.. "तू एक तस्कर आहेस पैशासाठी तू जनावरे मारून तस्करी करतोस आणि मी सर्व-सामान्यांसाठी हाती शस्त्र घेतले आहे. आपले मार्ग वेगवेगळे आहेत."
दिनांक १६ जानेवारी 2018 रोजी इस्लामपुरातल्या 'आधार हास्पिटल' येथे वयाच्या 96 व्या वर्षी बापू बिरू वाटेगावकरांचे निधन झाले.